Entertainment

गुरूंच्या संस्कारांतूनच संगीत साधनेला खरा अर्थ प्राप्त होतो – पं. सुरेश तळवलकर

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतींना अभिवादन करीत ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

“पुरस्काराने मन आनंदित होतं, नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. अशा वेळी गुरूंची आठवण येणं स्वाभाविक आहे. गुरुकृपेशिवाय साधनेला अर्थ नाही आणि संगीत क्षेत्रात गुरूंचं स्थान अनन्यसाधारण आहे. शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला हे संगीताचे चार महत्त्वाचे स्तंभ आहेत. शास्त्र समजावलं जातं, तंत्र शिकवलं जातं, विद्या दिली जाते; पण कला संस्कारित करते. संगीताचं ज्ञान बाहेरून आत येत नाही, ते अनुभूतीतून आत्मसात होतं. वेगवेगळ्या अनुभवांतून ज्ञान प्राप्त होतं आणि हे ज्ञान नेहमी आतून बाहेर प्रवाहित होतं. अनुभूती साधनेशिवाय, साधना संस्कारांशिवाय आणि संस्कार गुरूशिवाय शक्य नाहीत, असे सांगत भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभिजात परंपरेतील गुरूचे महत्त्व पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी अधोरेखित केले. १६ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२६’च्या दिमाखदार समारंभात ते बोलत होते. यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’  पद्मश्री तालयोगी श्री पं.सुरेश तळवलकर यांना प्रदान करण्यात आला.

यंदाचा १६वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२६’ सोहळा ठाण्याच्या  गडकरी रंगायतन मध्ये उत्साहात संपन्न झाला. खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले आकर्षक मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.  लोककलेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संगीत नाटक अकादमी व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते.

‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२६’ मध्ये लोककला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा, छायाचित्रण आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी पद्मश्री सुधारक ओलवे, अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रासाठी संदेश कुलकर्णी, अभिनय क्षेत्रासाठी अभिनेत्री अमृता सुभाष, तर नवोन्मेष प्रतिभा या विभागात गायक चैतन्य देवढे (माऊली) यांना सन्मानित करण्यात आले.

“मला आणि संदेशला एकत्रितपणे मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. आज हा पुरस्कार स्वीकारताना बाबांची खूप आठवण येतेय. विठ्ठल उमप यांच्या सच्च्या सुरातून, त्यांच्या कामातून आणि आठवणींतून आजही आम्ही खूप काही शिकत आहोत. त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणं, ही भावना शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी खूप खास आहे.” अशा भावना अभिनेत्री अमृता सुभाष यांनी यावेळी व्यक्त केल्या.

संदेश कुलकर्णी म्हणाले, हा  ‘प्रेमाचा सोहळा’ असून यात सहभागी होता आलं, याचा खूप आनंद आहे. उत्तम कलाकारांसोबत पुरस्कार स्वीकारण्याची आणि या सुंदर सोहळ्याचा भाग होण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. हा पुरस्कार पुढील प्रवासात आणखी चांगलं काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल.”

गायक चैतन्य देवढे (माऊली) यांनी पुरस्कार स्वीकारताना विठ्ठलाचा आशीर्वाद लाभल्याची भावना व्यक्त केली. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, पुरस्कारामुळे आनंद आणि नवी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार लाखमोलाचा असल्याची भावना पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली. सोहळ्यात प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे, अरुण पेदे वेसावकर आणि त्यांच्या मंडळींनी आपल्या बहारदार कलाविष्कारातून लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सांगीतिक मानवंदना अर्पण केली.

“बाबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचा वारसा पुढे नेताना आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आजवर ६५ मान्यवरांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली. या मान्यवरांचा सन्मान करताना आम्हालाही सन्मानित झाल्यासारखं वाटतं, अशी भावना व्यक्त करत प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे आभार मानले. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

लोककलेचा गौरव, मान्यवरांचा सन्मान आणि विठ्ठल उमप यांच्या स्मृतींना सांगीतिक मानवंदना देणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.

GExpressNews | The latest news from India and around the world. Latest India news on Bollywood, Politics, Business, Cricket, Technology and Travel.

Related Posts

1 of 47

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *